Pune : ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’मधून २३५ मुलांचा शोध

पुणे – मध्य रेल्वेच्या आरपीएफकडून ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत मागील दोन महिन्यांत २३५ मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप पालकांकडे सोपवण्यात आले. त्यामध्ये पुणे विभागातून ५१ मुलांना शोधण्यात यश आले. रेल्वे प्रवासात मुले स्टेशनवर किंवा स्टेशनवर राहणे किंवा गर्दीत मुले हरवितात.
तसेच, काही मुले घरात वाद झाल्यावर निघून जातात. ही मुले रेल्वेने अन्य शहरात येतात. मात्र, राग कमी झाल्यावर परत जाण्याचा मार्ग लक्षात येत नाही. अशावेळी हरविलेली आणि पळून गेलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफकडून ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहीम राबविण्यात येते.
त्यानुसार एप्रिल आणि मे २०२५ या दोन महिन्यांत मध्य रेल्वेच्या आरपीएफ, रेल्वे पोलीस (GRP), इतर रेल्वे कर्मचारी व चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने २३५ मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवले. त्यामध्ये एप्रिल महिन्यात ११४ व मे महिन्यात १२१ मुलांना शोधण्यात यश आले. त्यामध्ये सर्वाधिक भुसावळ रेल्वे विभाग येथून ६२ आणि नागपूर रेल्वे विभागातून ६१ मुलांना शोधण्यात आले. दरम्यान, एप्रिल आणि मे २०२४ या कालावधीत १४९ मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवले.
घरातील भांडण, कौटुंबिक समस्या, चांगल्या आयुष्याच्या शोधात किंवा शहराच्या झगमगाटामुळे अनेक मुले घरातून निघून रेल्वे स्थानकांवर येतात. काही मुले वेगळ्या राज्यात येतात. त्यावेळी स्थानकावरील आरपीएफ जवान या मुलांशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांचे समुपदेशन करून पालकांकडे सोपवितात. त्यामुळे दर महिन्याला शंभरहून अधिक मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचविण्याचे काम हे आरफीएस जवान व स्वयंसेवि संस्था करते.
ऑपरेशन जीवनरक्षक
धावत्या गाड्यांमध्ये चढताना किंवा उतरताना अनेकवेळा प्रवाशांचा पाय घसरून किंवा तोल जाऊन दुर्घटना घडतात. यावेळी स्थानकावरील आरपीएफ जवानांकडून तत्काळ या प्रवाशांना मदत करून जीव वाचविला जातो. मागील दोन महिन्यांत (एप्रिल आणि मे २०२५) आरपीएफने 12 प्रवाशांचे (9 पुरुष व 3 महिला) प्राण वाचवले.





