पुणे : दसरा ते धनत्रयोदशीदरम्यान शहरात 21 हजार 247 नवीन वाहनांची विक्री

पुणे – दसऱ्यानंतर दिवाळीमध्ये वाहन खरेदीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. गतवर्षीपेक्षा यंदाही दसरा ते धनत्रयोदशी या काळात पुण्यात नव्याने २१ हजार २४७ वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ हजार १६४ ने वाहन खरेदीत वाढ झाली आहे.
दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे नागरिक दसऱ्याला वाहन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. याशिवाय दिवाळीतही धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा आणि भाऊबीजेला वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दसरा ते दिवाळी या काळात पुण्यात सर्वाधिक वाहन खरेदी होत असते. यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाहने खरेदी केल्याचे दिसून आले आहे. नागरिकांकडून दुचाकी, कार, रिक्षा, बस आणि टॅक्सी खरेदी करण्यात चांगलीच वाढ दिसत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी घटली –
दसरा ते दिवाळी या काळात एकूण वाहन खरेदी वाढली असल्याचे दिसत असले, तरी दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत घट झाल्याचे दिसत आहे. २०२३ मध्ये या काळात १ हजार ७०२ ई-वाहने खरेदी करण्यात आली होती. मात्र, यंदा फक्त ६५८ ई-वाहनांची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट घट झाली आहे. त्यामध्ये दुचाकी आणि कार खरेदीत अधिक घट झाल्याचे दिसून येते.





