Pune : आठ दिवसांत १५ चितळांचा मृत्यू; कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्रकार

पुणे – कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गेल्या आठ दिवसांत चितळ जातीच्या १५ हरणांचा मृत्यू झाला असून, कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणी मरण्याची संग्रहालयातील ही पहिलीच घटना आहे. मृत्युमुखी पडलेल्या चितळांमध्ये मादींची संख्या सर्वाधिक आहे.
सहा जुलै रोजी एक चितळ मृत्युमुखी पडल्याचे संग्रहालयाच्या प्रशासनाला आढळून आले. त्यानंतर सलग आणखी दोन दिवस प्रत्येकी एक दिवस चितळ मृत्युमुखी पडले. नऊ जुलै रोजी एकाच दिवशी पाच चितळ मृत्युमुखी पडल्याने याबाबत प्रचंड गांभीर्य निर्माण झाले. त्यानंतर १२ तारखेपर्यंत अन्य सात चितळांचा मृत्यू झाले आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येने चितळांचा मृत्यू ही प्राणीसंग्रहालय प्रशासनासाठी धक्कादायक बाब होती. त्यामुळे कोणत्या रोगाचा प्रादूर्भाव झाला असेल का, या संशयातून जैवसुरक्षेचा विचार करून या चितळांना अन्न देणाऱ्या आणि त्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याला अन्य ठिकाणी जाण्याला मज्जाव करण्यात आला. जेणेकरून अन्य प्राण्यांना प्रादूर्भाव होऊ नये. मात्र त्यानंतरही आणखी सात चितळांचा मृत्यू झाला.
रोगाच्या प्रादूर्भावाने चितळांचा मृत्यू झाला आहे, की अन्नातून विषबाधा झाली आहे, याचा तपास सुरू असून, शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स येथील तज्ज्ञांच्या पथकाने १४ जुलै रोजी प्राणीसंग्रहालयाला यासंदर्भात भेटही दिली. मात्र, या प्राण्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत अद्याप अचूक निदान होऊ शकले नाही.
चितळ खंदकाच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करून परिसरातील प्राण्यांवर पशुवैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांद्वारे निरीक्षण करण्यात येत आहे. इतर प्राण्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही समस्या निर्माण होऊ नये आणि त्यांच्या जीविताला धोका होऊ नये, यासाठी प्राणी संग्रहालयातच आवश्यक जैवासुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. – डॉ. राजकुमार जाधव, संचालक, स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालय
प्राणीसंग्रहालयाचा खुलासा
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात सात जुलै अखेरपर्यंत ३९ नर आणि ६० मादी असे एकूण ९९ चितळ प्राणी होते. सात ते १२ जुलै या कालावधीत आजारपणाबाबत कोणतीही पूर्वलक्षणे न दिसता एकूण १५ चितळ मृत पावले आहेत. त्यानंतर आजपर्यंत एकाही प्राण्याचा मृत्यू झाला नाही. उर्वरीत चितळांच्या प्राण्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होत आहे.
मृत प्राण्यांच्या शरीराचे अवयव आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी बरैली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेतील नॅशनल रेफरल सेंटर फॉर वाइल्ड लाइफ डीसीज मॉनिटरींग अँड प्रीव्हेन्शन, ओरिसा राज्यातील भुवनेश्वर मधील आयसीएआरचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन फूट एँड माउथ डीसीज, भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीज या प्रयोगशाळेत, पुण्यातील औंध येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, नागपूर येथील गोरेवाडामधील विभागीय वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र या सर्व ठिकाणी पाठवण्यात आले आहेत.





