Pune: अकरावी प्रवेशाची कॅप लगबग; ६६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदविले पसंतीक्रम

पुणे – पुणे, पिंपरी- चिचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी एक़ुण ९२ हजार २६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील पहिल्या नियमित प्रवेश फेरीच्या कॅप अंतर्गत ६६ हजार ६६२ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले आहेत.
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित प्रवेश फेरीला ५ जूनपासून सुरूवात झाली आहे. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. अकरावी प्रवेशासाठी ३४३ महाविद्यालयांत १ लाख १९ हजार २९० प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. कॅप अंतर्गत ९२ हजार ८२७ व कोटाअंतर्गत २६ हजार ४६३ प्रवेशाच्या जागांचा समावेश आहे.
प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८० हजार २३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग -१ भरून ते लॉक करण्यात आले आहेत. ३७ हजार ७३ अर्जांची ऑनलाइन पडताळणी तर ४२ हजार २८० अर्जांची मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून पडताळणी झाली आहे. कॅप अंतर्गत महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविताना नामांकित व सोयीच्या महाविद्यालयांनाच प्राधान्य दिले आहे. कोटा अंतर्गतच्या प्रवेशासाठी ८ हजार १७९ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविले आहेत.
पहिल्या नियमित प्रवेश फेरी अंतर्गत अर्जाचा भाग- १ व २ भरणे, प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे व ऑनलाइन सादर करणे, विद्यार्थ्यांना भाग- २ मध्ये किमान एक व कमाल १० महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविणे अशी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. प्रवेश अर्जचा भाग-१ भरण्यासाठीची मुदत १५ जूनला संपली आहे.
आता १८ ते २१ जून या कालावधीत प्रवेश अर्जाचा भाग – २ भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करुन त्यावर हरकती, सूचना मागविण्यात येणार आहे. त्यानंतर २६ जूनला प्रवेश फेरीचे कट अॉफ व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठीच्या कनिष्ठ महाविद्यालयांची निवड यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.



