Pune : प्रत्येक फेरीपूर्वी नव्या विद्यार्थ्यांना अर्जाची संधी; अकरावी प्रवेशासाठीचा निर्णय

पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्जनोंदणी न केलेल्या नव्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक प्रवेश फेरीच्या सुरूवातीला नव्याने अर्जाचा भाग एक व भाग दोन भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अकरावीची ऑनलाइन अर्जनोंदणीची प्रक्रिया नूकतीच पूर्ण झाली. परंतु, बहुतांश विद्यार्थी वैयक्तिक कारणास्तव अर्जनोंदणीत सहभागी झाले नाहीत. अकरावी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता प्रवेश फेरीच्या अगोदर पुन्हा अर्ज करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावेत, प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांना आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार असून यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
यावर्षी राज्यभरात अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. प्रत्येक विभागातून १२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्जनोंदणी पूर्ण केली आहे. प्रवेशाच्या तीन नियमित व एक खुली फेरी होणार असून अर्जसंख्येत आणखी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग एक लॉक केला आहे तसेच भाग दोन अद्याप भरलेला नाही किंवा लॉक करणे बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आज (दि. ७) रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.





