अकरावी प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर
पुणे – केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत इयत्ता अकरावी प्रवेशाच्या पहिल्या नियमित फेरीची (कॅप) गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी अखेर शनिवारी ( दि. २८) सांयकाळी जाहीर करण्यात आली. या पहिल्या प्रवेश फेरी अंतर्गत राज्यातील ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून त्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयही अलॉट करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी विज्ञान शाखेलाच अधिक पसंती दिली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे सतत पुढे ढकलली जात होती. २६ जूनला प्रत्यक्षात प्रवेश यादी जाहीरच झाली नव्हती. त्यानंतर ३० जूनला प्रवेश यादी जाहीर होण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्या आधीच यादी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ३० जून ते ७ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी जाहीर झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. ९ जुलैला प्रवेश फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
शाखांनुसार प्रवेश…
पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदविले होते. यातील ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. कला शाखेसाठी २ लाख ३१ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यातील १ लाख ४९ हजार ७९१ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे.
वाणिज्य शाखेसाठी २ लाख २४ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. विज्ञान शाखेसाठी ६ लाख ९ हजार ७१८ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. त्यातील ३ लाख ४२ हजार ८०१ विद्यार्थ्यांचा प्रवेश जाहीर झाला आहे.
कोट्याअंतर्गत ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांना प्रवेश…
विविध कोटा अंतर्गत प्रवेशासाठी १ लाख ४५ हजार २२५ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. व्यवस्थापन कोट्याअंतर्गत ३२ हजार ९५३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ७ हजार ७५६ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे.
इन-हाऊस कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी ६४ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी २६ हजार ५२१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. अल्पसंख्याक कोट्याअंतर्गतच्या प्रवेशासाठी ४७ हजार ७९५ विद्यार्थ्यांपैकी २६ हजार २१० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे.




