Punha Shivaji Raje Bhosale : नुकताच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू असून, मात्र हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा वाद थेट कोर्टात गेला असून, या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर या सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपी या सिनेमा निर्मिती कंपनीने दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर तसेच त्यांच्या आगामी पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यामध्ये कॉपीराइटचे उल्लंघन आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा वाद २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाच्या मालकी हक्क आणि बौद्धिक संपदा हक्कांशी संबंधित आहे. त्यावेळी एव्हरेस्टकडे 60 टक्के आणि महेश मांजरेकर यांच्याकडे 40 टक्के हक्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर नव्या सिनेमाच्या निर्मात्यांना एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटसाठी सिनेमाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. महेश मांजरेकर काय म्हणाले? २००९ मध्ये मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या सिनेमाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. बॅाक्स अॅाफिसवर मोठी कमाई करत सिनेमाने नवा इतिहास रचला होता. त्यामुळे पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा सीक्वल असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत होती. अखेर सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यानी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. नवीन सिनेमा कोणत्या सिनेमाचा सिक्वल, दुसरा भाग नसल्याचे महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केले. हा प्रयत्न कोणाच्याही आडकाठीशिवाय… सिनेमाच्या पूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. हा सिनेमा आमच्या श्रद्धेतून जन्माला आलेला सिनेमा आहे. पुन्हा शिवाजीराजे भोसले हा आमचा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नाही, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे, असे महेश मांजरेकरांनी सांगितले. शिवरायांचा पराक्रम, त्यांचा आदर्श आणि त्यांचा न्यायप्रिय स्वभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे. हा प्रयत्न कोणाच्याही आडकाठीशिवाय, कुठल्याही भीतीशिवाय आणि संपूर्ण प्रामाणिकपणे सुरू राहील, असे देखील महेश मांजरेकर म्हणाले. हेही वाचा : “पोटदुखीवाल्यांची व्यवस्था ‘या’ दवाखान्यात केली”; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला