“पोटदुखीवाल्यांची व्यवस्था ‘या’ दवाखान्यात केली”; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Eknath Shinde | सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावात गेल्यानंतर विरोधकांकडून होणाऱ्या टिकेवर सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यावरून देखील त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
‘‘विरोधकांकडे सध्या मुद्दाच नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज करेन, याची त्यांनी कल्पना केली नव्हती. मी दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांची ‘दिवाळी काळी’ होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागले,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले.
“विरोधक मुद्दा नसल्यामुळे दिशाभूल करत आहेत. जर चांगला निर्णय घेतला तर त्याला चांगले म्हटले पाहिजे. हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन चांगले मुख्यमंत्री आहेत, असे म्हणत होते. आता मात्र मुख्यमंत्री कसे अपयशी आहेत, हे सांगत सुटले आहेत. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. हे त्यांचे कायमचे रडगाणे आहे,” असा चिमटाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काढला. Eknath Shinde |
तर दरे गावात गेल्यानंतर टीका करणाऱ्यांना, “मी दिल्लीत गेलो किंवा गावाकडे, अनेकांची पोटदुखी सुरू होते. अशांचा मी विचार करत नाही. पोटदुखीवाल्यांची व्यवस्था आम्ही केली असून, त्यांच्यासाठी मोफत ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला आहे,” असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. Eknath Shinde |
हेही वाचा:
पाकिस्तान-अफगाणिस्तान तात्काळ युद्धबंदीसाठी तयार ; दोहा बैठकीनंतर कतारमध्ये घोषणा





