‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाने दोन दिवसात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; पाहा बॅाक्स अॅाफिसची आकडेवारी…

Shivajiraje Bhosale box office again : नुकताच बॅाक्स अॅाफिसवर महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाराजे भोसले’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ३१ अॅाक्टोबर या दिवशी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली असून, बॅाक्स अॅाफिसवर चांगले कलेक्शन गोळा केले आहे.
या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा होती. अखेर पुन्हा शिवाजाराजे भोसले हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॅाक्स अॅाफिसवर १९ लाख रुपयांची कमाई केली आहे.
दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने याचा मोठा फायदा सिनेमाला झाला असून सिनेमाने ३४ लाख रुपयांची कमाई केली आहे. अशा प्रकारे या बिग बजेट सिनेमाने केवळ दोनच दिवसांत एकूण ५३ लाख रुपयांचा गल्ला बॅाक्स अॅाफिसवर गोळा केला आहे. आज रविवार असल्याने सिनेमाची कमाई आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुरुवातीला हा सिनेमा साडेसात ते आठ कोटींच्या घरात पूर्ण होईल, असा अंदाज होता मात्र, सिनेमाची भव्यता आणि ऐतिहासिक सत्यता जपण्यासाठी लागलेल्या खर्चामुळे अखेरीस या सिनेमाचे बजेट वाढून १३ कोटी रुपयांवर पोहोचले असल्याचे सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केले.
या सिनेमात सिद्धार्थ बोडके, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, पायल जाधव, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप आणि विक्रम गायकवाड यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.





