‘पुन्हा दुनियादारी’ पाहायला मिळणार; लवकरच सुरू होणार शूटिंग

Punha Duniyadari Film | दिग्दर्शक संजय जाधव यांचा ‘दुनियादारी’ चित्रपट सुपरहिट ठरला. यातील कलाकरांचा अभिनय, कथा, संवाद प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. 11 वर्षानंतर आता ‘पुन्हा दुनियादारी’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि संजय जाधव ही टीम भेटली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या पुढील भागाबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर याबाबत आता अधिकृतरित्या माहिती देण्यात आली आहे.
‘पुन्हा दुनियादारी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. यातून आता ‘दुनियादारी’तील मैत्री प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. ‘पुन्हा दुनियादारी’मध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांची यारी पाहायला मिळणार आहे. मात्र त्यांची कट्टा गँग ‘पुन्हा दुनियादारी’त त्यांना साथ देणार का, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘पुन्हा दुनियादारी’ या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरु होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर अमेय खोपकर, स्वाती खोपकर, उषा काकडे, नानूभाई जयसिंघानी, निनाद बत्तीन निर्माते आहेत.
दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले की, “शिरीन, श्रेयस, दिघ्या या मैत्रीचा संगम परत ‘पुन्हा दुनियादारी’ च्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 11 वर्षांची आतुरता संपत अखेर ‘पुन्हा दुनियादारी’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. परंतु पुन्हा एकदा या टीमसोबत एकत्र काम करण्याची मजाच और आहे. हे बॉण्डिंग इतके स्ट्रॉन्ग आहे की, त्याचे पडसाद ‘पुन्हा दुनियादारी’ मध्ये निश्चितच दिसतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. Punha Duniyadari Film |
दरम्यान, ११ वर्षांपूर्वी आलेला दुनियादारी सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमातील श्रेयस, शिरीन, सुरेखा आणि दिग्या ही पात्र चांगलीच हिट झाली. या कलाकारांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होणार आहे.
हेही वाचा:
प्रसिद्ध गायिका उषा उथुप यांच्या पतीचे निधन, घरी टीव्ही पाहत असताना आला, ‘हृदयविकाराचा झटका’





