Entertainment । भारतीय पॉप आयकॉन आणि लोकप्रिय गायिका उषा उथुप यांचे पती जानी चाको उथुप यांचे सोमवारी रात्री निधन झाले आहे. त्यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. जानी यांनी घरी टीव्ही पाहताना अस्वस्थतेची तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, जे त्यांच्या मृत्यूचे कारण बनले. जानी हे उषा उथुप यांचे दुसरे पती होते आणि ते चहा शेती उद्योगाशी संबंधित होते. उषा आणि जानी यांची पहिली भेट 70 च्या दशकाच्या सुरुवातीला कोलकाताच्या ट्रिंकझ या आयकॉनिक रेस्टॉरंटमध्ये झाली होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. जानी चाको उथुप यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
उषा यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला उषा उथुप यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. उषा उत्थुप यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. ‘हरी ओम हरी’, ‘रांबा हो’, ‘डिस्को डान्सर’ अशी अनेक गाणी त्यांनी गायली आहेत. उषा उत्थुप यांना शशी कपूर यांनी ब्रेक दिला आणि आज उषा उथुप एक प्रसिद्ध गायिका बनल्या उषा उत्थुप यांनी 16 भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ज्यामध्ये बंगाली, हिंदी, पंजाबी, आसामी, ओरिया, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू या भाषांचा समावेश आहे.