Pulse Polio Campaign : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम! जाणून घ्या, पुण्यात कुठे आणि केव्हा मिळणार पोलिओ डोस.

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहर आणि जिल्ह्यात रविवारी (दि. १२) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, पालकांनी ० ते ५ वयोगटातील लहान मुलांना पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन पुणे महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून करण्यात आले.महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ५४ दवाखाने, १९ प्रसूतिगृहे, ६५ नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र यांसह १ हजार ३५० बूथ, ८६ मोबाईल टीम यांसह समाजमंदिर, बांधकाम साईट आणि वस्ती भागात पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेचे उद्घाटन महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते नारायण पेठ येथील कलावतीबाई मावळे दवाखाना येथे होईल. दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत मुलांना पोलिओ डोस देण्यात येणार असून, ३ लाख १२ हजार ७५५ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दि. १३ ऑक्टोबरपासून १० लाख ४० हजार घरांना भेटी देऊन बूथवर डोस दिला आहे की नाही याची खात्री केली जाईल. ज्यांनी डोस घेतला नाही, त्यांना डोस देण्यात येणार आहे.
त्यासाठी १५ हेड सुपरवायझर, ३१४ पर्यवेक्षक, १९१२ पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच प्रवासात असणारी बालकांच्या लसीकरणासाठी बसस्थानके, एसटी स्थानके, मेट्रो, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, उद्याने याठिकाणीही पथके उपलब्ध असणार आहे. दि. १२ ते १७ ऑक्टोबरदरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डाॅ. राजेश दिघे यांनी सांगितले.





