Assembly Election 2026 : पुद्दुचेरीत एनडीएचे जागावाटप फायनल! एआयएनआरसी १६ तर भाजप १० जागा लढवणार
Assembly Election 2026 : पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी एआयएनआरसी आणि भाजपमध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Assembly Election 2026 : भाजप आणि एआयएनआरसी या पुद्दुचेरीतील सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे यावेळी भाजपच्या वाट्याला १ अधिक जागा असल्याचे स्पष्ट झाले.
पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री आणि एआयएनआरसीचे नेते एन.रंगासामी यांनी भाजपचे नेते असणारे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये दोन्ही पक्षांतील जागावाटपावर सहमती झाली. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेचे एकूण संख्याबळ ३० इतके आहे.
त्यातील १६ जागा एआयएनआरसी लढवेल. दोन्ही पक्षांमधील समझोत्यानुसार भाजपसाठी उर्वरित १४ जागा सोडण्यात आल्या. मात्र, भाजप आपल्या कोट्यातून अण्णाद्रमुक आणि एलजेके या मित्रपक्षांना प्रत्येकी २ जागा देईल. त्यामुळे प्रत्यक्षात भाजप १० जागा लढवेल.
मागील वेळी त्या पक्षाने एनडीएचा घटक म्हणून ९ जागा लढवत ६ जागा जिंकल्या. त्यावेळीही आता इतक्याच जागा लढवणाऱ्या एआयएनआरसीने १० जागांवर बाजी मारली.
मागील वेळीही एनडीएचा घटक असणाऱ्या आणि ५ जागा लढवणाऱ्या अण्णाद्रमुकला खाते उघडता आले नव्हते. त्या आघाडीसमोर यावेळी सत्ता राखण्याचे आव्हान आहे. पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुकीसाठी ९ एप्रिलला मतदान होईल.





