Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाजपची संमती गरजेची; छगन भुजबळांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या विलीनीकरणावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

Chhagan Bhujbal : “जसे दोन ठाकरे एकत्र आले, तसे दोन पवारही एकत्र यायला हवेत” असे सूचक विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नसून, असे काही करायचे असल्यास भाजपला विचारावे लागेल, असे स्पष्ट मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी भुजबळ कुटुंबीय नाशिक जिल्ह्यातील येवला येथे उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली.
‘आम्हाला भाजपला विचारावे लागेल’
छगन भुजबळ म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत जे काही करायचे असेल, ते भाजपसोबत सरकारमध्ये राहूनच करावे लागेल. त्यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. कोणाला घ्यायचे, कोणाला नाही, याचा निर्णय एकतर्फी होऊ शकत नाही.”
विलीनीकरणाबाबत आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “माझ्याशी तरी यासंदर्भात कधीही चर्चा झाली नाही, कल्पनाही नाही,” असे भुजबळ म्हणाले.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा आवश्यक
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, “राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारावेच लागेल. ज्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये आहोत, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय होऊ शकत नाही.”
जर सरकारमधून बाहेर पडून एनडीएबाहेर जाण्याचा विचार असेल, तर ती गोष्ट वेगळी असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, असा विचार अजित पवारांनी केला असेल, असे आम्हाला अजिबात वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नेतृत्वावर विश्वास, चर्चा होतील
“आम्ही उपमुख्यमंत्री निवडले आहेत. आता त्यांचे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा होतील, कधी काही घडते, कधी घडत नाही,” असे म्हणत सुनेत्रा पवार यांच्याशीही या विषयावर चर्चा होऊ शकते, असे संकेत भुजबळ यांनी दिले. छगन भुजबळांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.






