प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नियमित होणारी वाहतूक कोंडी ही स्थानिकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यात प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतापाचा उद्रेक झाला. वाहतूक कोंडी व खड्ड्यांच्या समस्येबाबत स्थानिकांनी आक्रमक होऊन जनआंदोलन केले. यावेळी गावकरी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एकवटले. तरूणांनी मुंडन करून बांधकाम विभागाचा निषेध केला. प्रशासनाने वाहतूककोंडीबाबत उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ट्राफिक मुक्त शिक्रापूर कृती समितीच्या वतीने दिला आहे. शिक्रापूर येथे नियमित होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ट्राफिक मुक्त शिक्रापूर कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदने देत जनआंदोलन पुकारले होते. माजी आमदार काकासाहेब पलांडे, सरपंच रमेश गडदे, माजी उपसरपंच मयूर करंजे, सुभाष खैरे, त्रिनयन कळमकर, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, ट्राफिक मुक्त शिक्रापूर कृती समितीचे अक्षय भुजबळ, रवींद्र भुजबळ, सतीश सासवडे, अंकुश घारे, मंगल सासवडे, राजेंद्र मांढरे, कांतीलाल गवारे, निलेश थोरात, गौरव करंजे, शिवाजी मांढरे भाऊसाहेब केवटे, काकासाहेब चव्हाण, विजय लोखंडे, पंढरीनाथ गायकवाड, अमर करंजे, अशोक धुमाळ आदींच्या उपस्थितीत जनआंदोलन सुरु झाले. मात्र, प्रत्येक विभागाला निवेदन देऊन देखील फक्त उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब शिंदे, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर उपस्थित होते. बांधकाम विभागाचे कोणी फिरकले देखील नाही. दरम्यान, रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त करावेत, पोलिसांनी विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक बंद करावी, तसेच प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करीत सर्व विभागांच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांच्या माध्यमातून बैठक बोलावावी, अशी मागणी केली. यावेळी स्थानिकांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करीत मनोगत व्यक्त केले. माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी थेट रस्त्यावर ठिय्या मांडला. दरम्यान, आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्याकडे देण्यात आले. पुढील कामात प्रशासनाने कडक पावले उचलून वाहतूक कोंडीसाठी उपाययोजना न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. बांधकाम विभागाबाबत नाराजी.. शिक्रापूर येथे पुकारण्यात आलेल्या आंदोलनात वाहतूक कोंडीचा विषय असताना वाहतूक कोंडीला मुख्य कारण रस्त्यावरील खड्डे, चुकीचे अतिक्रमण हे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीही फिरकले नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्रापूरमधील वाहतूककोंडीबाबत आपण स्वतः पाहणी केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून या आठवडाभरात आंदोलकांसह सर्वांची एक बैठक घेऊन वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत दिशा ठरवणार आहे. -प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी.