Pune District : लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्या; उरुळीत प्रवासी संघाचे खासदार कोल्हेंना साकडे
Pune District : आयटी पार्क (हडपसर, खराडी, हिंजवडी), भोसरी व तळेगाव एमआयडीसीमध्ये नोकरी-व्यवसाय करणारे लाखो नागरिक येथे वास्तव्यास आहेत. मात्र, लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना नाहक पुणे किंवा दौंड स्थानक गाठावे लागत आहे.

उरुळी कांचन : मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या असलेल्या उरुळी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना कायमस्वरूपी 2 मिनिटांचा थांबा द्या, लोणावळा ते दौंड उपनगरीय (लोकल) रेल्वे सेवा डिसेंबरपर्यंत पूर्ववत सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी उरुळी कांचन प्रवासी संघाच्या वतीने शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पत्र पाठवून साकडे घालण्यात आले आहे.
एखाद्या रास्त प्रश्नासाठी नागरिकांना आणि प्रवाशांना 10 ते 15 वर्षे संघर्ष करावा लागत असेल, तर हे खरोखरच जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे का? असा रोखठोक सवाल उरुळी कांचन प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.
उरुळी कांचन हे पुणे शहराच्या जवळ असलेले आणि वेगाने विकसित होणारे उपनगर आहे. महात्मा गांधींनी 1946 मध्ये स्थापन केलेला निसर्गोपचार आश्रम येथे असून, याच स्थानकावरून गांधीजींना दिल्लीला नेण्यासाठी ब्रिटिश सरकारने विशेष डब्यांची रेल्वेगाडी पाठवली होती. देश-विदेशातील पर्यटक, निसर्गोपचार केंद्रात येणारे रुग्ण, सिंधी समाजाचे धार्मिक स्थळ (प्रयागधाम मंदिर), देशातील सर्वात मोठा रोपवाटिका व्यवसाय व फर्निचर बाजारपेठ येथे कार्यरत आहे.
रिंग रोड, पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्ग आणि तळेगाव दाभाडे ते उरुळी मालवाहतूक रेल्वे मार्ग यांमुळे या भागाचे महत्त्व अधिक वाढले आहे. आयटी पार्क (हडपसर, खराडी, हिंजवडी), भोसरी व तळेगाव एमआयडीसीमध्ये नोकरी-व्यवसाय करणारे लाखो नागरिक येथे वास्तव्यास आहेत. मात्र, लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना नाहक पुणे किंवा दौंड स्थानक गाठावे लागत आहे.
उपनगरीय रेल्वेबाबत दुजाभाव का?
संपूर्ण कोकणात एकत्रित लोकसंख्या ५५ लाखांपेक्षा कमी असताना पनवेल ते चिपळूण लोकल सेवा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, दुसरीकडे पुणे जिल्ह्याची लोकसंख्या 1 कोटी 25 लाखांपेक्षा जास्त असूनही लोणावळा ते दौंड उपनगरीय रेल्वे सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही याबद्दल प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन उरुळी कांचन परिसरातील लाखो नागरिकांना व प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गाड्यांना थांबा देण्याची मागणी
यामध्ये इंटरसिटी एक्सप्रेस, शिर्डी-पुणे एक्स्प्रेस, लातूर – मुंबई एक्स्प्रेस, अमरावती – पुणे एक्स्प्रेस, नागपूर – पुणे एक्स्प्रेस, दौंड – इंदूर एक्स्प्रेस, काझीपेट – हडपसर एक्स्प्रेस, पुणे – सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट एक्स्प्रेस, निजामुद्दीन – कोल्हापूर एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे – अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस, बिदर – मुंबई (CSMT) एक्स्प्रेस, नांदेड – हडपसर एक्स्प्रेस, नांदेड – पनवेल एक्स्प्रेस एमजीआर चेन्नई – मुंबई एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.





