रुग्णालयांतील आरक्षित जागांबाबत तातडीने स्पष्टीकरण द्या : आयएमए

राज्य शासन, महापालिकेकडे मागणी : आदेशाबाबत संभ्रम
पुणे – खासगी रुग्णालयांतील खाटा करोना बाधितांच्या उपचारांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, हे आदेश नेमके कोणत्या रुग्णालयांना लागू असतील, त्याची अंमलबजावणी कशी केली जाणार, याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याचे सांगत इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आएमए) याबाबत सरकार आणि महापालिकेकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढून खाजगी रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा आरक्षित ठेवण्याचा आदेश दिला आहे. यावर आता रुग्णालयांना नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आदेशाबाबत अद्यापही काही गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे. यामध्ये हा नियम फक्त मोठ्या रुग्णालयांसाठी आहे, की 10 पेक्षा कमी खाटांच्या रुग्णालयांनाही आहे? अधिगृहित केलेल्या रुग्णालयांशी सरकार करार करणार आहे का? स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये करोनाबाधीत रुग्णांवर कसे उपचार होऊ शकतील? करोनाचे रुग्ण दाखल झाल्यावर 20 टक्के छोट्या आणि मध्यम रुग्णालयातील खाटांचा उपयोग काय? करोनाचा संसर्ग नसलेले रुग्ण उपचारांसाठी कुठे जाणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत, असे “आयएमए’ने म्हटले आहे.
खाटांच्या अधिग्रहणासाठी 80-20 फॉर्म्युला वापरला आहे. त्यात सर्व छोट्या आणि मध्यम आकाराच्या रुग्णालयांनी सातत्याने सरकारबरोबर काम करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मात्र, या आदेशातील काही अनुत्तरित प्रश्नांमुळे डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
– डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, “आयएमए’ राज्य शाखा





