पुणे जिल्हा | मुळशीत पूल, रस्ता, ड्रेनेज सुविधा पुरवा

पौड, (वार्ताहर) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मुळशीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या बाबाजी शेळके यांनी विविध मागण्या केल्या आहेत.
घोटवडे, रिहे, शेळकेवाडी (पिंपळोली) येथील अत्यावश्यक गोष्टींची मागणी केली असून प्राधिकरणाने नागरिकांच्या सोयीसाठी त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. आयुक्त योगेश म्हसे यांनी हे मागणीचे निवेदन स्वीकारले असून त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
घोटवडे ते आंधळे रस्त्यावरील पिंपळोली बसस्टॉप जवळ असलेल्या ओढ्यावर पूल करण्यात यावा, ही मागणी करण्यात आली आहे.
पावसाळ्यात सद्यस्थितीत असलेल्या ओढ्यावर पावसाच्या पाण्यामुळे रस्ता बंद होतो व खांबोली, कातरखडक, आंधळे या गावातील नागरिकांचा संपर्क तुटतो, प्रवास करता येत नाही व दळणवळण बंद होते. येथे ओढ्यावर योग्य पूल बांधला गेला तर पावसाळ्यातही प्रवासाचा मार्ग सुकर होऊ शकेल.
घोटवडे गावातील शेळकेवाडी स्मशानभूमी जवळील ओढ्यावर साकव बांधणे गरजेचे आहे. तो बांधल्यास लोकांना दळणवळण तसेच अंत्यविधीस जाण्यास रस्ता उपलब्ध होणार आहे.
तर कासारसाई येथे साईनगर मध्ये 300 घरांसाठी सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने तेथे ड्रेनेज तसेच सिमेंट काँक्रीटचा रस्ता करणे अत्यंत गरजेचे आहे, आदी सुविधा उपलब्ध कराव्यात ही मागणी शेळके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.





