Bhor : सरसकट मदत द्या; अन्यथा आंदोलन
Bhor : यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख (पूर्व) दशरथ गोळे, तालुकाप्रमुख (पश्चिम) भरत साळुंके, युवासेना तालुकाप्रमुख अनिकेत शिंदे, महेंद्र भोरडे, भोर शहरप्रमुख चंदन कोळसकर, गणेश खटवड व विवेक शिंदे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

भोर :भोर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेला तातडीने सरसकट आर्थिक मदत मिळावी. तसेच दुष्काळी सवलतीही मिळाव्यात, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार राजेंद्र नजन व उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
अनियमित पाऊस, पावसातील खंड, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईमुळे भोर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडून हैराण झाला आहे. शेत पिकासाठी केलेला खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून शेतमजुरांना रोजगार आणि जनावरांना चारा-पाण्याची समस्या भेडसावत आहे.
दुष्काळग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून सरसकट मदत जाहीर करावी, पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसानभरपाई द्यावी, पीकविमा व पीक नुकसानभरपाई तातडीने मिळावी, पीककर्ज व वीजबिलात सवलती द्याव्यात, टँकरने पाणीपुरवठा करावा, चारा छावण्या सुरू कराव्यात आणि रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख (पूर्व) दशरथ गोळे, तालुकाप्रमुख (पश्चिम) भरत साळुंके, युवासेना तालुकाप्रमुख अनिकेत शिंदे, महेंद्र भोरडे, भोर शहरप्रमुख चंदन कोळसकर, गणेश खटवड व विवेक शिंदे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
आंदोलनाचा इशारा
‘केवळ पंचनामे आणि आश्वासने नकोत, शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष आर्थिक मदत जमा करा,’ अशी मागणी करत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून लेखी अहवाल द्यावा, असे पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. प्रशासनाने याकडे दिरंगाई केल्यास शेतकरी व ग्रामीण जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.





