पुणे जिल्हा | वौष्णवांसाठी उत्तम सोयी उपलब्ध करा

आळंदी, (वार्ताहर) – सुरक्षित वारी, हरित वारी या संकल्पनेवर आधारित या वर्षीची वारी असावी. राज्यभरातून आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येणार्या वारकरी भाविकांना उत्तम सोयी उपलब्ध करून द्या, सर्व प्रशासकीय यंत्रणानी आपापसात समन्वय ठेवून कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अधिकार्यांना दिल्या.
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे 29 जून रोजी प्रस्थान होणार आहे. या प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो भाविक तीर्थश्रेत्र आळंदीला येतात. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 29) जिल्हाधिकार्यांनी आळंदी येथील दर्शनबारी जागा, भक्तीसोपान पूल, स्कायवॉक, नदी पात्रातील जलपर्णी, प्रदक्षिणा मार्ग यांची पाहणी करून प्रशासकीय यंत्रणांना दिशानिर्देश दिले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, हवेली प्रांत संजय आसवले, खेड तहसीलदार प्रशांत बेडसे, आळंदीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, देवस्थानचे विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, डी. डी. भोसले पाटील, माऊली मंदिराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी शहर शिवसेना प्रमुख राहुल चव्हाण, नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
या पाहणी दरम्यान मंदिर समिती विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, डी. डी. भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्या केल्या. त्यांना अनुसरून जिल्हाधिकारी यांनी दरवर्षी प्रमाणे दर्शन बारीची जागा वारी कालावधीत प्रशासनाच्या ताब्यात घेण्याचे आदेश लवकरात लवकर निर्गमित करण्याच्या सूचना हवेली प्रांताधिकारी यांना केल्या. तसेच भक्ती सोपान पुलाची डागडुजी करणेसाठी आवश्यक निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या.
जलपर्णी काढण्यासाठी जेसीबी, पोकलँड देणार
इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढण्याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचे सहकार्य घेतले जाईल, तसेच येत्या काळात जलपर्णी नियमितपने काढता यावी, म्हणून आळंदी नगरपरिषदेस जेसीबी, पोकलँड मशीन खरेदी साठी निधी उपलब्ध करून दिला, जाईल असे जिल्हाधिकारी म्हणाले.





