पुणे | साधक निर्दोष असल्याचे सिद्ध

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालातून सनातन या संस्थेचे साधक निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, सनातन संस्था ही हिंदू आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचा अर्बन नक्षलवाद्यांचा डाव फसला आहे, असा दावा सनातन संस्थेतर्फे करण्यात आला.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सनातन संस्थेतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सनातन संस्थेचे पदाधिकारी सुनील घनवट, अभय वर्तक, चेतन राजहंस, चैतन्य तागडे उपस्थित होते.
हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात वारंवार तपास यंत्रणांनी आरोपी बदलेले आहे. तपास यंत्रणांनी सुरूवातील सारंग अकोलकर, विनय पवार हे मारेकरी असल्याची भूमिका मांडली होती. मात्र, या भूमिकेत बदल करून कळसकर आणि अंदुरे यांनी हत्या केल्याचे न्यायालयात सांगितले.
त्यामुळे तपास यंत्रणेच्या बदलच्या भूमिका, साक्षीदारांच्या भूमिका या संशयास्पद होत्या. या गुन्ह्यात “यूएपीए’ कायदा लावून सनातन संस्थेला आतंकवादी ठरवून बंदी घालण्याचा डाव होता. मात्र, न्यायालयाने यूएपीए कायदाही रद्द ठरवला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार शोधण्याऐवजी हे प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले, असा आरोप संस्थेतर्फे करण्यात आला.
सचिन अंदुरे, शरद कळसकर यांचा सनातन संस्थेशी प्रत्यक्ष संबंध नसला, तरी त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याबाबत दाद मागावी. उच्च न्यायालयात हे दोघे देखील निर्दोष मुक्त होतील, असा विश्वासही संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आला.





