अभिमानास्पद ! ऑस्करच्या शर्यतीतून आऊट झालेल्या ‘Laapataa Ladies’नं ‘या’ देशात रचला मोठा इतिहास

Laapataa Ladies Japan : भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आलेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी सध्या हा सिनेमा भारताच्या बाहेर चांगलाच गाजत आहे. काही दिवसांपूर्वी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने (AMPAS) बेस्ट इंटरनॅशनल फीचर गटातील 15 शॉर्टलिस्ट चित्रपटांची यादी जारी केली होती. मात्र, या यादीमध्ये किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपटाचा समावेश गेला नाही.
आमिर खान प्रोडक्शन अंतर्गत तयार झालेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट 97व्या अकादमी पुरस्कारासाठी (Oscars 2025) बेस्ट इंटरनॅशनल फीचर गटामध्ये भारताकडून अधिकृत एंट्री म्हणून पाठवण्यात आला होता. मात्र, पहिल्या टप्प्यातील 15 शॉर्टलिस्ट चित्रपटांमध्ये याचा समावेश नसल्याने भारताच्या आशा संपल्या होत्या. दरम्यान, असं असलं तरी सध्या हा चित्रपट इतर देशांमध्ये चांगलाच हिट झाला आहे.
किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटामध्ये रवी किशन, स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रंता आणि नितांशी गोयल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हृदयस्पर्शी कथा, नर्म विनोदी आणि काळजाला भिडणारे संवाद यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘लापता लेडीज’ हा सिनेमा देशाच्या सीमा ओलांडून 4 ऑक्टोबर 2024 रोजी जपानमध्ये प्रदर्शित झाला.
परदेशातील प्रेक्षकांवरही या सिनेमाच्या कथानकाची मोहिनी चालली आहे. हा चित्रपट जपानमध्ये ११५ दिवसांनंतरही चांगला चालत आहे. या चित्रपटानं जपानमध्ये स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलंय आणि जपान अकादमी चित्रपट पुरस्कारात पाच सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
‘लापता लेडीज’ आता जपानमध्ये 17 व्या आठवड्यात आहे आणि 115 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर अखंडपणे सुरू आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या 204 आंतरराष्ट्रीय चित्रपटांपैकी पाच सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटांपैकी एक म्हणून जपान अकादमी चित्रपट पुरस्कारासाठी या चित्रपटाची निवड केली आहे. आता 14 मार्च रोजी जाहीर होणाऱ्या ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ पुरस्काराकडे सर्वांच्या नजरा टिकून आहे. यामध्ये देखील हा सिनेमा कोणती कमाल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





