Myanmar : चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्याविरोधात ‘म्यानमार’मध्ये निदर्शने

नायपितॉ (म्यानमार) – म्यानमारच्या दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग (Qin Gang) यांच्या विरोधात म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू झाली आहेत. म्यानमारमधील शांतता चर्चेच्या निमित्ताने चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा म्हणजे म्यानमारमधील लष्करी राजवटीवर चीनचा प्रभाव असल्याचे स्पष्ट होते आहे.
चीनच्या या प्रभावाला म्यानमारच्या नागरिकांकडून होत असलेला विरोध म्हणून ही निदर्शने केली जाऊ लागली आहेत. लेपाडांग, सागाइंग प्रदेशात निदर्शनादरम्यान आंदोलकांनी किन गांग यांचे फोटो फाडले आणि चिनी ध्वजाचे दहन केले.
मॅग्वे, यंगून, मंडाले आणि सागिंगच्या इतर भागांमध्येही अशीच निदर्शने झाली, तिथे विरोधी गटांनी चिनी ध्वज आणि किन गांग आणि म्यानमारची संसद जंटामधील लष्करी नेते मिन आंग हलाईंग यांच्या प्रतिमा जाळल्या. फॅसिस्ट गुन्हेगारांचे समर्थन करणे थांबवा आणि म्यानमारच्या लोकांच्या आवाजाचा आदर करा अशी विनंती करणारे बॅनर फडकवले गेले.
म्यानमारमधील लष्करी प्रशासनासोबतच्या चीनच्या घृणास्पद सहकार्याविरोधातील निषेध आंदोलन तीव्र केले जाईल, असे लष्करी शासन विरोधी संघटना “जनरल स्ट्राइक कोऑर्डिनेशन बॉडी’ने सांगितले. म्यानमारमधील लष्करी शासनाबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी आणि आर्थिक सहकार्यासाठी चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग म्यानमारच्या दौऱ्यावर आले आहेत.





