चेन्नईत TCSच्या कर्मचारी कपातीविरोधात निदर्शने; अनुभवी कर्मचार्यांना डच्चू, नव्या कर्मचार्यांना कमी पगारावर नियुक्तीचा आरोप

चेन्नई – विविध कंपन्याकडून होत असलेल्या कर्मचारी कपाती विरोधात चेन्नई येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचार्यांनी निदर्शने केली. जुन्या अनुभवी कर्मचार्यांच्या जागेवर नव्या कर्मचार्यांची कमी पगारावर नियुक्ती केली जात असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.
काही दिवसापूर्वी टीसीएस कंपनीने कर्मचार्यांची संख्या 12,000 ने कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. ही कर्मचारी कपात मध्यम व उच्च स्तरावरील गटात केली जाणार असल्याचे हे कंपनीने स्पष्ट केले होते. कंपनीने सांगितले की अशी फेररचना वेळोवेळी केली जात असते. त्यानुसार 12000 कर्मचारी कमी करावे लागणार आहेत.
कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी असे सांगितले की, प्रत्यक्षात वर्षाच्या अखेरीस तीस ते चाळीस हजार कर्मचार्यांना कमी केले जाण्याची शक्यता आहे. नेत्यांनी सांगितले की, कर्मचार्यांना कमी करण्याऐवजी त्यांच्या कौशल्यात सुधारणा करून त्यांना कामात सामावून घेण्याची गरज आहे. टीसीएस कंपनीची उलाढाल 2.55 लाख कोटी रुपयाची आहे. तर कार्यचालन नफा 24.3 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने 45, 588 कोटी रुपयाचा लाभांश देऊनही 12,000 कर्मचार्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे या संघटनेने म्हटले आहे.
अतिउच्च पदावरील व्यक्तींना भरमसाठ पगार वाढ दिली जाते. मात्र सर्वसाधारण कर्मचार्यांना कामावरून कामा काढले जाते असा आरोप करण्यात आला. दरम्यान सरकार या घटनेकडे दुर्लक्ष करत असून सरकारच या कंपनीला कंत्राट देत आहे असे संघटनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.





