हत्येच्या निषेधासाठी जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांची निदर्शने

श्रीनगर – काश्मिरी पंडित असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केल्याच्या घटनेने शुक्रवारी जम्मू-काश्मीर ढवळून निघाले. हत्येचा निषेध करण्यासाठी काश्मिरी पंडित समुदाय रस्त्यांवर उतरला. त्या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केला. त्या घडामोडींमुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली.
हत्येमुळे संतप्त झालेल्या काश्मिरी पंडित समुदायातील सदस्यांनी काश्मीरात विविध ठिकाणी निदर्शने केली. त्या निदर्शनांचे केंद्रस्थान मध्य काश्मीरातील बडगाम जिल्हा ठरले. त्या जिल्ह्यातील शेखपोरामध्ये जमलेल्या निदर्शकांनी श्रीनगर विमानतळाच्या दिशेने निषेध मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोर्चा काढण्यावर निदर्शक ठाम राहिले. त्यामुळे त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
निदर्शने करणाऱ्यांमध्ये काश्मिरी पंडित समुदायातील सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. त्यांनी सुरक्षा करण्यात अपयश आल्याचा आरोप करत जम्मू-काश्मीर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.





