अभिनेते सलमान खान विरोधात निदर्शने

जोधपूर : चित्रपट अभिनेता सलमान खान यांच्या विरोधात हरिण शिकार प्रकरणास विलंब होत असल्याबद्दल वन्यजीवप्रेमींनी जोधपूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
विष्णोई समाजातील लोकांनी सलमान खानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सलमान खान विरोधात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये लवकर सुनावणी करून निकालाची मागणी केली. आपल्या मागण्यांसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनाही निवेदन दिले आहे .
अखिल भारतीय विष्णोई महासभेचे राष्ट्रीय प्रतिनिधी ओम प्रकाश लोळ म्हणाले की, सलमान खानविरूद्ध हरिण शिकार करण्याचे वेगवेगळे खटले कोर्टात प्रलंबित आहेत.
वीस वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही त्यांना शिक्षा झालेली नाही. न्यायालयीन निर्णयामुळे आणि सुनावणीला उशीर झाल्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही. विष्णोई समाज या प्रकरणांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, त्वरित कार्यवाही करून, खटले निकाली काढण्याची मागणी करत आहेत. विष्णोई समाजाने सुनावणीदरम्यान ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची मागणी केली आहे. आम्ही सर्व साक्षीदार असूनही, सलमान खान यांना आजपर्यंत शिक्षा झालेली नाही. देशातील कोट्यावधी लोकांच्या भावना निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे वैष्णोई समाजाचे म्हणणे आहे.





