मनोज जरांगेंची हाक अन् आझाद मैदानावर लाखो आंदोलकांची कूच, गर्दी जमण्यास सुरुवात

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यातील संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. मनोज जरांगे यांना आझाद मैदानात एक दिवसासाठी आंदोलनाची परवानगी मिळाली असली तरी त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून तुकड्या तुकड्यांमध्ये मराठा बंधू-भगिनी हजारोंच्या संख्येने मुंबईकडे ट्रेन, चारचाकी, दुचाकी वाहने, ट्रॅक, टेम्पो आदी वाहनांमधून दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे आझाद मैदान परिसरात गर्दी वाढू लागली आहे. डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवी मफलर, हातात भगवा झेंडा, बॅनर, फलक घेऊन मराठे लोक ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘कोण म्हणतो देणार नाही, अरे घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशा घोषणांनी सीएसएमटी रेल्वे स्थानक, आझाद मैदान परिसर दणाणून गेले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी उपोषणाची जय्यत तयारी मराठा समाजाकडून आझाद मैदानात युद्धपातळीवर सुरू असून दुपारपासून भव्य स्टेज उभारण्याचे काम सुरू आहे. उद्या जरांगे आझाद मैदानात दाखल होणार असून तत्पूर्वी स्टेज, स्टेजवर बैठक व्यवस्था, साऊंड सिस्टीम, मान्यवरांची भाषणे यांचे प्लॅनिंग जोरात सुरू आहे. मुंबईमध्ये जरांगे पाटील उद्या दाखल होण्यापूर्वीच आझाद मैदानातील संपूर्ण व्यवस्था पार पाडण्यात येत आहे.
तसेच मराठ्यांचा मोर्चा उद्या आझाद मैदानात येण्यापूर्वी वाहनांची पार्किंग नजीकच्या रेल्वे स्थानक परिसरात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, उद्या वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मराठे समाजाची वाहतूक व्यवस्था हाताळणारी समिती रस्त्यावर उतरवून वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना मदत करणार असल्याचे मराठे समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले.



