Protest by tribal students : आदिवासी विद्यार्थ्यांचे संभाजी उद्यानासमोर आंदोलन
Protest by tribal students :

मांजरीतील आंदोलकांची प्रकृती गंभीर असल्याचा दावा
Protest by tribal students : वसतिगृह प्रवेशासाठीची वयोमर्यादा रद्द करावी, सेंट्रलाईज्ड किचन पद्धत बंद करावी, नोकरभरती करावी, पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी, तसेच विदर्भात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थीनींच्या कुटुंबांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत द्यावी आदी मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानासमोर ठिय्या आंदोलन केले. मांजरी येथे गेल्या ११ दिवसांपासून विद्यार्थी उपोषणाला बसले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वारगेट ते संभाजी उद्यान अशी पायी रॅली काढली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे आमदार रोहित पवार यांनी मांजरी आणि संभाजी उद्यान या दोन्ही आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
काही मागण्या शासनाने मान्य केल्या असल्या तरी संपूर्ण मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत, असे पवार यांनी सांगितले. संबंधीत मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत त्या मान्य कराव्यात. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सोमवारपर्यंत मार्ग निघाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलन मागे घेतलेले नाही
आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याच्या वृत्ताचे विद्यार्थी प्रतिनिधी सूरज कोकणी यांनी खंडन केले. शासनासोबत दोन दिवस चर्चा झाली. मुख्यमंत्री स्तरावर चर्चा झाली नाही आणि मागण्यांवर सकारात्मक निर्णय झालेला नाही, असा दावा त्यांनी केला. वसतिगृह प्रवेशासाठीची वयोमर्यादा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच नोकरभरतीतील पदसंख्या, बिंदूनामावलीतील बदल आणि १२ हजार ५०० अधिसंख्य पदांचा प्रश्न सोडविण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा करून निर्णय घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कोकणी यांनी व्यक्त केला.





