पुणे जिल्हा | मंदिर महासंघातर्फे मंचर येथे आंदोलन

मंचर, (प्रतिनिधी) – आंध्रप्रदेश येथील तिरुपती बालाजी येथील मंदिरात देण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी व माशांचे तेल अशा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंचर (ता. आंबेगाव) येथे आंदोलन करण्यात येऊन निषेध केला. यावेळी ७० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलनामध्ये भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात, भाजपचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष नामदेव अण्णा खैरे, रणरागिनी शाखेच्या क्रांती पेटकर,वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बाळासाहेब शेगडे महाराज, मंदिर महासंघाचे राजेंद्र शेवाळे, बजरंग दलाचे उमेश कंधारे यांनी विचार व्यक्त केले.
याचबरोबर ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर, हिंदू जनजागृती समितीचे दिलीप शेटे, शरद सहकारी बँकेचे संचालक दत्ताशेठ थोरात, स्व. चंद्रशेखर अण्णा बाणखेले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहासभाऊ बाणखेले, मंदिर महासंघाचे मार्तंड डेरे, बजरंग दलाचे गणेश राऊत, तपनेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष चंदुलालशेठ पटेल,
श्रीकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पिंगळे, वडगावचे माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, उद्योजक शंकरशेठ पटेल आणि अमृतलाल पटेल व अन्य धर्मप्रेमी यांचीही या आंदोलनाला उपस्थिती लाभली.
उपस्थित सर्वांनी एकमुखाने पुढील मागण्या केल्या. तिरुपती देवस्थानात येणाऱ्या भाविकांना प्राण्यांच्या चरबीपासून बनवण्यात आलेल्या तूप वापरून बनवलेला प्रसाद देणाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.





