Raghav Chadha : मुंबईत राघव चढ्ढांविरोधात आंदोलन; आपचे कार्यकर्ते ताब्यात
पोलिसांनी चढ्ढा यांच्या विरोधात शांततेने आंदोलन करण्यापासून आपच्या कार्यकर्त्यांना रोखले आणि स्थानिक नेते रुबेन मस्कारेन्हास यांना ताब्यात घेतले.

Raghav Chadha – राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्या विरोधात खार परिसरातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी आम आदमी पक्षाच्या (आप) काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
राघव चढ्ढा आणि पक्षाचे इतर सहा राज्यसभा खासदारांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांच्या विरोधात खार परिसरात आंदोलन करण्याचे नियोजन आपच्या मुंबई शाखेने केले होते.
आपच्या मुंबई शाखेच्या अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी दावा केला की, पोलिसांनी चढ्ढा यांच्या विरोधात शांततेने आंदोलन करण्यापासून आपच्या कार्यकर्त्यांना रोखले आणि स्थानिक नेते रुबेन मस्कारेन्हास यांना ताब्यात घेतले. मस्कारेन्हास आणि इतर काही कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांकडे राघव चढ्ढा यांच्या मुंबईतील निवासस्थानाचे रक्षण करण्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम उरलेले नाही. आपच्या कार्यकर्त्यांना चढ्ढाविरोधात आंदोलन करण्यापासून रोखले. मात्र, भाजपला मात्र त्यांच्या मर्जीनुसार रस्ते अडवण्याची मुभा दिली जाते, असे त्या म्हणाल्या.
तसेच, कोणतेही ताब्यात घेण्याचे आदेश किंवा कोणतेही लेखी पत्र नसतानाही मला खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. गद्दार राघव चढ्ढा आणि संदीप पाठक यांच्या विरोधातील शांततापूर्ण आंदोलनाला पोलिस इतके का घाबरत आहे? आम्ही अरविंद केजरीवाल यांचे सैनिक आहोत. आम्ही कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, असे मस्कारेन्हास यांनी एका पोस्टमध्ये म्हटले.





