Heatwaves in India – देशभरात तापमानाचा पारा सातत्याने वाढत असतानाच, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आता कडक पावले उचलली आहेत. वाढत्या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना बसत असल्याचे निरीक्षण नोंदवत आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र, दिल्लीसह २१ राज्यांना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये वृद्ध, बालके आणि नवजात अर्भकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. देशाच्या अनेक भागांत, विशेषतः दिल्लीत तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने मुख्य सचिवांना पत्र लिहून एकात्मिक आणि सर्वसमावेशक उपाययोजना करण्याची निकड व्यक्त केली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे केवळ आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर हातावर पोट असणाऱ्यांच्या उपजीविकेवर गदा येते आणि आगीच्या दुर्घटनांचा धोकाही वाढतो, असे आयोगाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीचा दाखला देत आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत भारतात उष्माघातामुळे सुमारे ३,७१२ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची आणि मानक कार्यप्रणालीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘या’ राज्यांना दिला इशारा ! आयोगाने ज्या राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे, त्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. बेघर नागरिक, उघड्यावर काम करणारे मजूर आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाकडे निवारा आणि पुरेशी साधने नसल्यामुळे त्यांना उष्णतेचा थेट सामना करावा लागतो. या घटकांसाठी विशेष मदत उपाययोजना राबवून जिल्हास्तरावरील कामाचा एकत्रित अहवाल सादर करण्याचे निर्देशही मानवाधिकार आयोगाने दिले आहेत.