Nashik Heat Wave – नाशिक जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, कडक उन्हामुळे सर्वजण हैराण आहेत. नाशिक परिसरातील शेवगे दारणा येथे उन्हाच्या झळांमध्ये पाइपलाइन दुरुस्त करताना एका शेतकर्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश रघूनाथ कासार (वय ४५) हे आपल्या शेतात पाणी पोहोचवणारी पाइपलाइन नादुरुस्त झाल्यामुळे ती दुरुस्त करण्यासाठी दुपारी तप्त उन्हात काम करत होते. दुपारी सुमारे तीन वाजता त्यांना चक्कर येऊन ते कोसळले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने कासार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. नाशिक जिल्ह्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेले असून, उष्णतेची तीव्र झळ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे.