नगर – विधानसभेसाठी ६ आॅगस्टला प्रारुप तर ३० अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

नगर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने कंबर कसली आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाला मतदार यादी कार्यक्रम जाहिर झाला असून मंगळवारी (दि.६) रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. तर अंतिम मतदार यादी ही (दि.३०) ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदार केंद्रावर सुसूत्रात आणण्यासाठी दि. २५ जून ते ५ ऑगस्ट दरम्यान सुसूत्रिकरण कार्यक्रम राबविण्यात आला. यानुसार जिल्ह्यात नव्याने ३२ मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. संगमनेर १०, नेवासा ६, शेवगाव ३, पारनेर १, नगर शहर ११ आणि श्रीगोंदा १ अशी ३२ मतदान केंद्र नवीन अस्तित्वात येणार आहेत.
दि. ६ ऑगस्ट रोजी प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर २० ऑगस्टपर्यंत मतदार यादीवर हरकती घेता येणार आहेत. यानंतर २० ते २९ ऑगस्ट दरम्यान या अर्जावर निर्णय घेण्यात येऊन ३० ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी छायाचित्रासह मतदार यादीचा सुधारित द्वितीय विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार आता अंतिम मतदार यादी ३० ऑगस्टला जाहीर होणार आहे. यापूर्वीच्या कार्यक्रमात अंतिम मतदार यादी २७ ऑगस्टला जाहीर होणार होती.





