चाकण एमआयडीसीतील 31 हजार परप्रांतीय कामगारांचे गावी जाण्याचे प्रस्ताव पुणे पोलीस कमिशनरांकडे दाखल

खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांची माहिती
राजगुरुनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी मधील ३१ हजार १४१ परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठीचे प्रस्ताव पुणे पोलीस कमिशनर कडे पाठविण्यात आले आहेत. राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ३९ हजार २०३ कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी खेड तहसीलदार कार्यालयाकडे प्रस्ताव आले. खेड तालुक्यातून तीन खासगी बसमधून वाशीम(५०) व नांदेड (१४) जिल्ह्यातील ६४ नागरिक स्वखर्चाने त्यांच्या मूळ गावी तीन बसच्या माध्यमातून पाठविण्यात आले असल्याची माहिती खेडच्या तहसिलदार सुचित्रा आमले यांनी दिली. दरम्यान बाहेरगावावरून ४८ जण तालुक्यात आले असल्याचे तहसीलदार आमले यांनी सांगितले.
खेड तालुक्यातून तीन खासगी बसमधून वाशीम(५०) व नांदेड (१४) जिल्ह्यातील ६४ नागरिक स्वखर्चाने त्यांच्या मूळ गावी शुक्रवारी प्रशासनाच्या परवानगीने (दि८) पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या करोना संसर्ग संबधी आरोग्य चाचण्या व इतर माहिती संकलीत झाल्यावर पोलीस कमिशनर व पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने पाठवले.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1208563139483389/
बाहेरच्या ठिकाणी कामा निमित्त वास्तव्य असलेल्या आदिवासी कुटुंबातील ४८ नागरिक गुरुवारी (दि७) खेड तालुक्यातील शिवे २०, कळ मोडी १२, देशमुखवाडी १४, निघोजे २ या गावी परतले आहेत. त्याना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली. लातूर व इतर जिल्ह्यातील कामगारांच्या आणखी बसेस रवाना होणार आहेत असेही आमले यांनी सांगितले. दरम्यान आज तिसरी गाडी वाशीम हिंगोली येथील कामगाराना घेऊन रवाना करण्यात आली यावेळी प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, राजेंद्र वाघ, तलाठी बबन लंघे, सतीश धस, संकेत तनपुरे, महेश खंडागळे उपस्थित होते.
खेड तालुक्यात चाकण, सेझ परिसरात एमआयडीसी आहे. येथे राज्याच्या अनेक भाग तसेच परराज्यातील कामगार आहेत. लॉकडाऊन काळात अडकून पडलेल्या कामगारांनाइच्छे नुसार त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी देण्याचे कामकाज सुरु आहे. प्राप्त झालेले ऑनलाईन प्रस्ताव पोलीस कमिशनर कार्यालयाला पाठविण्यात आले आहेत. ३१ हजार १४१ परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठीचे प्रस्ताव पुणे पोलीस कमिशनर कडे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये बिहार(६,५१२), उत्तर प्रदेश (१४,११२), मध्य प्रदेश (६,८५८), राजस्थान(५८४), कर्नाटक(३७३), आसाम (१,२४४), छत्तीसगड (७५२), ओरिसा (७१०) असे ३१ हजार १४१ परप्रांतीय कामगारांनी त्यांच्या मूळगावी जाण्याचे प्रस्ताव चाकण महाळुंगे पोलीस ठाण्यांतर्गत पुणे कमिशनरकडे पाठविले आहेत.
राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३९ हजार २०३ नागरिक रस्त्याने खासगी अथवा एसटीबस या वाहनाद्वारे जाऊ इच्छित आहेत. त्यांच्यासाठी रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या सर्वाना तळेगांव (ता मावळ) रेल्वे स्टेशन वरून जाण्यासाठी सोय करण्यात यावी असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. एका वेळी १ हजार २०० व्यक्ती जाऊ शकणार आहेत.
लॉकडाऊन झाल्यानंतर प्रशासन, स्थानिक संस्था, दानशूर व्यक्तींनी परप्रांतीय नागरीकांच्या जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारे केली. कामगारांची उपासमार झाली नाही. आता कंपन्या सुरु झाल्या आहेत मात्र तरीही काही कामगार त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर अनेक कामगार पायी पायी मार्गस्थ झाले आहे. सुमारे ४५ दिवस या परप्रांतीय कामगारांना सांभाळूनही ते गावाकडे जात असल्याने त्यांना जीवनावश्यक सेवा देणा-या नागरिकांचे ते आभार मानत आहेत. आपापल्या कंपन्या कधी सुरु होतात याकडे काही परप्रांतीय कामगारसंह राज्यातील कामगार लक्ष ठेऊन आहेत. गावाला जाण्यासाठी एकीकडे नाव नोंदणी केली आहे तर त्यातील अनेकांनी पुन्हा कंपनीत काम मिळेल या भावनेतून जाग्यावरच थांबणे पसंत केले आहे असे विसंगत चित्र समोर येत आहे .





