आंदेकर टोळीच्या झाडाझडतीत सापडली कोट्यवधींची मालमत्ता; पुणे पोलिसांचा पुढचा डाव तयार

पुणे : आंदेकर टोळीकडे करण्यात आलेल्या चौकशीत आणि घरझडतीत कोट्यवधींची मालमत्ता समोर आली आहे. विशेष म्हणजे, एवढ्या प्रचंड संपत्ती असूनदेखील त्यांनी आजवर एकदाही आयकर भरलेला नाही, अशी गंभीर बाब उघडकीस आली आहे. याबाबत आता पुणे पोलिसांनी आयकर विभागाशी अधिकृत पत्रव्यवहार सुरू केल्याची माहिती सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
शर्मा म्हणाले, “आंदेकर टोळीवर सर्व पातळीवर कारवाई सुरू आहे. चौकशीत मिळालेली माहिती पाहता इतकी मोठी माया एकदाही आयकर न भरता जमवली गेली आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आयकर विभागाशी समन्वय साधत आहोत.”
आता कोमकर टोळीवरही कारवाई –
एकीकडे आंदेकर टोळीवर धडक कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे वनराज आंदेकर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या अवैध मालमत्तेवरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड यांच्यासह टोळीशी संबंधित सर्व जणांचा तपास सुरू असून त्यांच्या बेकायदेशीर संपत्तीवरही अशाच प्रकारे कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
पोलिसांच्या या कारवाईनंतर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोठा धक्का बसणार असून अवैध संपत्तीचा तपास आयकर विभागाकडे वळल्याने अनेक धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





