महावितरणच्या कर्मचार्यांची तत्परता

कृष्णानगर – येथील एमआयडीसीतील उच्चदाब सबस्टेशनमधून खेडमधील नादुरुस्त झालेल्या फीडर वाहिनीच्या केबलची पाच तास अथक परिश्रम घेऊन दुरुस्ती करुन महावितरणच्या कर्मचारी व ठेकदारांनी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यश मिळवले. ऐन दिवाळीत महावितरणने बिघाड विक्रमी वेळात दुरुस्त केल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महावितरणच्या एमआयडीसी येथील उच्चदाब सब स्टेशन मधून येणारी 33 केवी पोवई नाका फीडर वाहिनी केबल गुरुवारी सकाळी 11 वाजता नादुरुस्त झाली. हा फिडर खेड येथील आदर्शनगरजवळ असून या फिडरमधूनच पोवईनाका सबस्टेशनला विद्युत पुरवठा केला जातो. बिघाड होताच महावितरणचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. तात्काळ वीज प्रवाह दुसर्या फिडरवर घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे पोवईनाका परिसर वीज खंडित होण्यापासून वाचला. महावितरणचे अधिकारी तसेच कर्मचारी व ठेकेदार यांच्या चार ते पाच तासाच्या परिश्रमानंतर सदर केबल दुरुस्त करण्यात यश आले.
याप्रसंगी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित नवाळे शाखा अधिकारी सौ. वैभवी पारवे व शाखाधिकारी बेडेकर, लाईनमन खरात, आवळे व ओव्हाळ, ठेकेदार गिरीश इलेक्ट्रिकल अँड सर्विसेसचे बाळासाहेब पोतदार, मनोज देवळे व आशिष देवळे यांनी परिश्रम घेतले.





