खळबळजनक…! इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्राध्यापकाची आत्महत्या; दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

मिरज : मिरज शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सहायक प्राध्यापकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. ०६) रात्री घडली आहे. बाळकृष्ण अनिल शिंदे (वय 26, रा. टाकळी रस्ता, मिरज) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. त्याने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांचे दोनच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे मिरज शहरातील महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होते. गुरुवारी रात्री त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जीवन संपविण्यापूर्वी प्राध्यापक शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
छळास कंटाळून तरुणाची आत्महत्या
आरपीआय पदाधिकाऱ्याकडून होत असलेल्या छळास कंटाळून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रवीण रावसाहेब गायकवाड (वय-३६, रा. मुटकेवाडी, चाकण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना चाकण लगतच्या मुटकेवाडी (ता. खेड) येथे गुरुवारी (दि. ६) सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्रवीण याची आई संगीता रावसाहेब गायकवाड (वय ५६, रा. लोणी बुद्रुक, ता. राहता, जि. अहिल्यानगर) यांनी या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रदेश सचिव सचिन बापूराव वाघमारे (वय-३८, रा. पानसरे मळा, चक्रेश्वर रोड, चाकण) याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.



