SPPU: डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे सोपविला ‘काटेरी मुकुट”

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक पदाची सुत्रे अखेर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता व मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.प्रभाकर देसाई यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदाचा डॉ. महेश काकडे यांचा कार्यकाळ दि. १० फेब्रुवारीला पूर्ण झाल्यामुळे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. पूर्णवेळ संचालक नियुक्तीची प्रक्रिया विद्यापीठाने राबविण्याची आवश्यकता होती. मात्र ती राबविण्याचा विद्यापीठाला विसरच पडला.
अखेर, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदाच्या अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी प्रा. डॉ.प्रभाकर देसाई यांच्याकडे सोपविली. प्रा. प्रभाकर देसाई यांनी तत्काळ बुधवारी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, आयक्यूएसी सेंटरचे संचालक डॉ. विनायक जोशी यांच्यासह परीक्षा विभागाचे सर्व उपकुलसचिव व इतर अधिकारी उपस्थित होते.
परीक्षा विभाग हा कटकटीचा व डोकेदुखीचा विभाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या विभागाचे संचालक पद घेण्यास सहजासहजी कोणी तयारही होत नाही. सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत आयोजित करणे, उत्तरपत्रिका तपासणी वेळेत पूर्ण करून वेळेत निकाल जाहीर करणे हे मोठे आव्हानात्मक काम असते. परीक्षा विभागाच्या कामकाजाबाबत सतत टिका, आंदोलन यांचा सामना या पदावरील मान्यवरास करावा लागतो. डॉ.प्रभाकर देसाई यांनाही आता आंदोलने, मोर्चे यांना सामोरे जावे लागणार आहे.


