श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यातर्फे हंगाम २०२३-२४ साठी देशातील उच्च साखर उतारा आणि उत्कृष्ट ऊस विकासासाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन जयंतीभाई बांभनिया आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले आणि संचालक मंडळाने स्वीकारला. याप्रसंगी साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याची यशस्वी वाटचाल आणि पुरस्काराचा मान
चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले की, कै. वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी श्री विघ्नहर कारखान्याची स्थापना केली. कारखान्याला यापूर्वीही अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. स्व. निवृत्तीशेठ आणि स्व. सोपानशेठ शेरकर यांच्या शेतकरी हित आणि पारदर्शक कारभाराच्या तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. या पुरस्काराने कारखान्याच्या यशस्वी प्रवासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गाळप क्षमता विस्तार आणि शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपाय
मागील वर्षी कारखान्याची गाळप क्षमता ५,००० मे. टनावरून ७,५०० मे. टनापर्यंत वाढवण्यात आली असून, यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. पुढील हंगामात १३ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये ८,००० ते ८,५०० मे. टन ऊस प्रति दिन गाळला जाईल. कारखाना १ जून २०२५ पासून ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना ऊस बेणे, रोपे आणि ताग बियाणे ऊधारीने पुरवत आहे. प्रति एकरी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना बांधावर मार्गदर्शन, जैविक किडनियंत्रकांचा पुरवठा, ठिबक सिंचन योजना, आणि मोफत माती-पाणी तपासणी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याशिवाय, व्हिएसआय उत्पादीत मल्टीमायक्रोन्युट्रीयंट, वसंत उर्जा आणि ह्युमिक अॅसिड यांसारख्या द्रवरूप खतांचा पुरवठा केला जात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शेतकरी कल्याणासाठी पुढाकार
लागवड हंगाम २०२५-२६ पासून कारखाना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीचा अवलंब करणार आहे. याशिवाय, विघ्नहर कृषी अमृत (फर्मेटेड सेंद्रिय खत) प्रति एकरी १० बॅग ऊधारीने पुरवले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी व्हिएसआय मांजरी येथे ज्ञानयाग आणि ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रति एकरी १०० मे. टनपेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवले जाते. गावोगावी शेतकरी मेळावे आयोजित करून प्रति एकरी उत्पादनवाढीला चालना दिली जात आहे, ज्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ होत आहे, असे शेरकर यांनी नमूद केले.





