वायनाडमध्ये प्रियंका करणार शक्तिप्रदर्शन; खर्गे, सोनिया, राहुलही राहणार उपस्थित

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी बुधवारी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी रोड शोच्या माध्यमातून त्या केरळमधील वायनाड मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करतील. त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच सोनिया आणि राहुल गांधी हे माजी अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत.
पोटनिवडणुकीच्या माध्यमातून प्रियंका प्रथमच उमेदवार म्हणून नशीब आजमावणार आहेत. निवडणुकीच्या मैदानातील त्यांचे पदार्पण धुमधडाक्यात करण्याचा चंग कॉंग्रेसने बांधला आहे. त्यातून अर्ज दाखल करताना प्रियंका यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी कॉंग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही प्रमुख राष्ट्रीय नेतेही उपस्थित राहणार असल्याचे समजते.
राहुल यांनी वायनाड मतदारसंघ सोडल्याने तिथे पोटनिवडणूक होत आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी झालेली लोकसभा निवडणूक वायनाड आणि रायबरेली (उत्तरप्रदेश) अशा २ मतदारसंघांमधून लढवली. दोन्ही ठिकाणी त्यांनी विजय प्राप्त केला. दोन्हीपैकी १ मतदारसंघ सोडणे अनिवार्य असल्याने राहुल यांनी वायनाड सोडण्याचा निर्णय घेतला. तेथील पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसने प्रियंका यांना उमेदवारी दिली. वायनाडमध्ये १३ नोव्हेंबरला मतदान होईल. त्या पोटनिवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल.





