वन नेशन, वन इलेक्शन जेपीसीसाठी प्रियंका गांधींचे नाव

नवी दिल्ली – वन नेशन, वन इलेक्शन यासाठी मंगळवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या 129व्या घटना (दुरुस्ती) विधेयकाचे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या संयुक्त संसदीय समितीमध्ये (जेपीसी) काँग्रेसच्या वतीने खासदार प्रियंका गांधी यांचा समावेश केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसने जेपीसीसाठी चार खासदारांची नावे सुचवली आहेत. यामध्ये प्रियंका यांच्याव्यतिरिक्त मनीष तिवारी, रणदीप सिंग सुरजेवाला आणि सुखदेव भगत सिंग यांचा समावेश आहे. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसने साकेत गोखले आणि कल्याण बॅनर्जी यांची नावे पुढे केली आहेत.
याशिवाय जेडीयूचे संजय झा आणि द्रमुकचे टीएम सेल्वागणपती आणि पी विल्सन हे 31 सदस्य असलेल्या पॅनेलचा भाग असण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपकडून अनुराग ठाकूर आणि पीपी चौधरी यांची नावे संभाव्य सदस्य म्हणून मानले जात आहेत. या समितीमध्ये लोकसभेतून 21 आणि राज्यसभेतून 10 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. या समितीसाठी बहुतेक पक्षांनी त्यांच्या निवडी सरकारला कळवल्या आहेत.
दरम्यान, 17 डिसेंबर रोजी केंद्रीय कायदा मंत्री मेघवाल यांनी लोकसभेत वन नेशन, वन इलेक्शन यासंदर्भातील घटना दुरुस्ती विधेयक मांडले होते. याला विरोधी पक्षाच्या खासदारांनी तिव्र विरोध दर्शविला होता.





