Priyanka Gandhi Vadra : बिहारमधील डबल इंजिन सरकार दिल्लीतून चालवले जाते; प्रियंका गांधी यांची टीका

पाटणा : डबल इंजिन सरकारमुळे बिहारचा विकास होईल अशी हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी देतात. मात्र, कथित डबल इंजिन सरकार दिल्लीतून चालवले जाते. त्यामुळे बिहारी जनतेला आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही योग्य सन्मान मिळताना दिसत नाही, अशा शब्दांत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी एनडीएचा प्रमुख घटक असणाऱ्या भाजपवर टीकास्त्र सोडले.
बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीच्या प्रचारात प्रियंका प्रथमच सहभागी झाल्या. त्यांनी शनिवारी बेगुसरायमधील सभेत बोलताना सत्ताधारी एनडीएवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. बिहारमध्ये १ कोटी रोजगार पुरवण्याचे आश्वासन देऊन सत्ताधारी जनतेला फसवू पाहत आहेत. त्यांनी आतापर्यंत रोजगार पुरवण्यासाठी कार्य का केले नाही, असा सवाल त्यांनी केला. भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने कॉंग्रेसच्या माजी पंतप्रधानांवर टीका केली जाते. त्या टीकेचा समाचार प्रियंका यांनी घेतला.
कॉंग्रेसची सत्ता असताना, पं.जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना बहुतांश कारखाने उभे राहिले. एवढेच नव्हे तर, आयआयटी आणि आयआयएमसारख्या संस्था स्थापन झाल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्रात सत्तेवर आल्यापासून मोदी सार्वजनिक संपत्ती त्यांचे मित्र असणाऱ्या बड्या उद्योगपतींना बहाल करत आहेत. ते जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी विभाजनवादी राजकारण आणि बनावट राष्ट्रवादाचा आधार घेतात. आता त्यांनी मतचोरीचे तंत्र अवलंबले आहे. एवढेच नव्हे तर, विविध योजनांच्या माध्यमातून जनतेचे मत खरेदी करण्याचा प्रयत्नही चालवला आहे. एक योजना पुढे करून महिलांना प्रत्येकी १० हजार रूपये देण्यात आले. महिलांनी त्यांची मते विकू नयेत, असे आवाहन प्रियंका यांनी केले.





