Priyanka Gandhi : टार्गेटेड हत्येचा तीव्र निषेध व्हायला हवा; प्रियंका गांधींनी मांडली परखड भूमिका
इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी मृत्युमुखी पडले. जागतिक सनसनाटी निर्माण करणाऱ्या त्या घडामोडीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी परखड भूमिका मांडली.

Priyanka Gandhi : इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी मृत्युमुखी पडले. जागतिक सनसनाटी निर्माण करणाऱ्या त्या घडामोडीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी परखड भूमिका मांडली. टार्गेटेड हत्येचा तीव्र निषेध व्हायला हवा, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
खामेनी यांच्या मृत्यूविषयी प्रियंका यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली. लोकशाहीवादी जगाच्या तथाकथित नेत्यांकडून सार्वभौम देशाच्या नेतृत्वाची टार्गेटेड हत्या आणि मोठ्या प्रमाणात निष्पाप लोकांचे हत्यासत्र घृणास्पद आहे. तशा प्रकारांचा कुठलेही कारण दिले गेले तरी निषेध केला जायला हवा. अनेक देश संघर्षात ओढले जाणे व्यथित करणारे आहे.
जगाला शांततेची गरज आहे; अनावश्यक युद्धांची नव्हे. डोळ्याच्या बदल्यात डोळा हे सूत्र संपूर्ण जगाला अंध बनवते, असा मौलिक विचार महात्मा गांधी यांनी मांडला. त्याची आठवण ठेवली जायला हवी, असे त्यांनी म्हटले. प्रियंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविषयी मोदी अतिशय आदरभाव बाळगून आहेत. आता ते सर्व भारतीयांना प्रभावित देशांमधून सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा वाटते, अशी टिप्पणी त्यांनी केली.





