प्रियांका गांधींच्या ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेल्या बॅगची पाकिस्तानातही चर्चा ; पाकचे माजी मंत्री म्हणाले,”आमच्या खासदारांमध्ये…”

Priyanka gandhi Palestine written bag । काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी सोमवारी संसदेत ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन दाखल झाल्या होत्या. त्यांचे हे पाऊल पॅलेस्टिनी जनतेला पाठिंबा आणि एकता दाखवणारे म्हणून सर्वत्र पाहिले जात आहे. प्रियंका गांधींच्या या प्रतिकात्मक पावलाची पाकिस्तानातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पॅलेस्टाईन बॅगशी संबंधित मुद्द्यावर पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हसन चौधरी यांनी प्रियंका गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबतच त्यांनी काही मजकूर देखील लिहिला आहे. त्यामध्ये फवाद यांनी, “जवाहरलाल नेहरूंसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नातवाकडून आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो? प्रियांका गांधी बटूंमध्ये उंच उभ्या आहेत. आजपर्यंत एकाही पाकिस्तानी संसद सदस्याने असे धाडस दाखविले नाही ही शरमेची बाब आहे.” असे म्हणत त्यांनी त्यांच्या खासदारांवरही टीका केली.
पॅलेस्टिनी चिन्हांचा वापर Priyanka gandhi Palestine written bag ।
प्रियंका गांधी यांच्या हँडबॅगमध्ये ‘पॅलेस्टाईन’ असे शब्द असलेले टरबूजाचे चित्रही होते. टरबूज हे पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक मानले जाते आणि पॅलेस्टिनी संस्कृतीचा भाग मानले जाते. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ टरबूज प्रतिमा आणि इमोजीचा वापर केला जातो.
What else could we expect from a granddaughter of a towering freedom fighter like Jawaharlal Nehru? Priyanka Gandhi has stood tall amidst pigmies, such shame that to date, no Pakistani member of Parliament has demonstrated such courage.#ThankYou pic.twitter.com/vV3jfOXLQq
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) December 16, 2024
गाझा संघर्षावर प्रियंका गांधी यांची भूमिका
प्रियांका गांधी दीर्घकाळापासून गाझामधील इस्रायलच्या कारवाईविरोधात आवाज उठवत आहेत. ऑक्टोबरमध्ये, हमास आणि इस्रायलमधील युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले, तेव्हा प्रियांकाने इस्रायलवर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आणि “नरसंहार” हिंसाचाराचा आरोप केला. याठिकाणी 7,000 लोक मारले गेले तरी हिंसाचार थांबला नाही, असे त्यांनी म्हटले होते. यामध्ये ३ हजार निष्पाप मुलांचाही समावेश आहे.
हे ‘तुष्टीकरणाचे राजकारण’-भाजपचा हल्लाबोल Priyanka gandhi Palestine written bag ।
प्रियंका गांधींच्या या पावलावर भाजपने निशाणा साधला आहे. भाजप नेते आणि खासदार संबित पात्रा यांनी,”गांधी कुटुंब नेहमीच तुष्टीकरणाची झोळी घेऊन आले आहे. निवडणुकीतील पराभवाचे कारण तुष्टीकरणाचे राजकारण आहे.” असा हल्लबोल देखील त्यांनी केला.
प्रियांका गांधी आणि पॅलेस्टाईनचे मुद्दे
वायनाडमधील निवडणूक प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांनी पॅलेस्टाईनचा मुद्दा ठळकपणे मांडला होता. जूनमध्ये प्रियांकाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर टीका केली होती आणि गाझामधील इस्रायलच्या कारवाईला ‘नरसंहार’ म्हटले होते. अलीकडेच पॅलेस्टाईन दूतावासाचे प्रभारी आबेद एलराजेघ अबू जजर यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली आणि निवडणूक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.





