Priyanka Gandhi | Bangladesh – बांगलादेशात संतप्त जमावाच्या हल्ल्यात झालेली हिंदू तरुणाची हत्त्या हा मानवतेला कलंक असून भारत सरकारने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन काॅंग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी केले आहे. बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेने आता अत्यंत भयानक वळण घेतले आहे. त्या ठिकाणच्या अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा आता धोक्यात आलेली आहे. मैमनसिंग येथे दीपू चंद्र दास या २५ वर्षीय हिंदू तरुणाची ईशनिंदेच्या संशयावरून झालेली मॉब लिंचिंग ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नसून ती मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. या घटनेचे पडसाद आता भारतातही उमटत असून, विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मैमनसिंग येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या दीपू चंद्र दास या तरुणावर ईशनिंदेचा आरोप करत संतप्त जमावाने हल्ला केला. केवळ मारहाण करून जमाव थांबला नाही, तर या तरुणाची निर्घृण हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. ही घटना अतिरेकी विचारांचा वाढता प्रभाव आणि तेथील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे जिवंत उदाहरण आहे. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या हत्येला मानवतेविरुद्धचा गुन्हा असे संबोधले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारला जाब विचारला आहे. मोदी सरकारने बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी तातडीने संपर्क साधून तेथील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची हमी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कोणत्याही सुसंस्कृत समाजात धर्माच्या नावावर होणारा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर कडक टीका केली आहे. केंद्र सरकार या संवेदनशील विषयावर मूक प्रेक्षक बनून का पाहत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भारताने आता हे धोरण सोडून प्रभावी राजनैतिक पावले उचलायला हवीत.