राज्यातील खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण येणार; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी नवीन कायदा आणणार आहोत. तसेच शालेय शिक्षण सुधारण्यासाठी रोड मॅप आखणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना दादजी भुसे बोलत होते.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले, केंद्र सरकारने खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यासाठी नियमावली करण्याचा प्रस्ताव आयुक्त पातळीवर तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नवीन अधिनियम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर खासगी शिकवणी वर्गावर अवलंबून राहावे लागते. या दुहेरी शुल्कामुळे पालकांवर आर्थिक ताण येतो, त्यामुळे शासनाने या विषयावर नियमन करण्याचे ठरवले आहे.
शिक्षणाच्या गुणवत्ता विकासासाठी रोड मॅप
राज्यातील ग्रामीण आणि शहरी शाळांमध्ये भौतिक सुधारणा आणि शिक्षणाच्या गुणवत्ता विकासासाठी रोड मॅप तयार करण्यात आल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली. प्रत्येक शिक्षकाला आधुनिक प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार असून राज्यभर पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा करणे, शिक्षकांचे शैक्षणिक कामकाज सुलभकरणे, शाळांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये सुधारणा, शिक्षक, शिक्षण संस्था आणि शासन एकत्रित येऊन विद्यार्थ्यांना गुण-वत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण देण्याचा संकल्प शासनाने केल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली.
या रोड मॅपमध्ये भौतिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा प्रसार, विद्यार्थ्यांसाठी भूकटीकरण, ई-लर्निंग आणि ई-लायब्ररीसारख्या सुविधा तसेच शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली आणण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येणार आहे.





