Prithviraj Chavan : कुंभमेळ्याच्या 35 हजार कोटींचा प्रकल्प अहवाल द्या; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
नाशिक कुंभमेळ्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ३५,००० कोटी रुपयांच्या निधीबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य सरकारने सार्वजनिक करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शुक्रवारी केली.

Prithviraj Chavan : नाशिक कुंभमेळ्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ३५,००० कोटी रुपयांच्या निधीबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य सरकारने सार्वजनिक करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शुक्रवारी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, कुंभमेळा हा एक मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने त्यासाठी निधी देण्यास कोणताही विरोध नाही; परंतु सार्वजनिक पैशांच्या वापरामध्ये सरकारने (Prithviraj Chavan) पारदर्शकता राखली पाहिजे. ३५,००० कोटी रुपयांच्या खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सरकारने सर्वप्रथम सार्वजनिक करावा.
३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ या कालावधीत होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत नियोजित कामे, त्यांची कंत्राटे ज्या संस्था किंवा कंत्राटदारांना देण्यात आली आहेत त्यांची माहिती, त्यांच्या निवडीची प्रक्रिया आणि खर्चाचे स्वरूप यांबाबत तपशील द्यावा.
तसेच, कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र मंत्र्याची नियुक्ती करण्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि ही नियुक्ती कोणत्या मंत्रालयांतर्गत करण्यात आली व त्यासाठी कोणती प्रशासकीय प्रक्रिया राबवण्यात आली, याची त्यांनी माहिती मागितली. या प्रकल्पाचा पर्यावरण आणि सामाजिक परिणामांचा अभ्यास करून तो अहवालही सार्वजनिक केला जावा, असे ते म्हणाले.
यापूर्वी काँग्रेस सरकारनेही कुंभमेळ्यासाठी निधी दिला होता आणि त्यातून नागरी सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रस्तावित ३५,००० कोटी रुपयांचा खर्च हा मागील कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चाच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक असल्याने त्याची अधिक बारकाईने तपासणी होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
स्मार्ट सिटी कार्यक्रमावर टीका करताना चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण अभियान राबवले होते, जो एक प्रभावी शहरी विकास कार्यक्रम होता.
नरेंद्र मोदी सरकारने नंतर त्याचे नाव बदलून स्मार्ट सिटीज कार्यक्रम असे केले, परंतु अपेक्षित परिणाम साध्य करण्यात त्यांना अपयश आले, असा दावा त्यांनी केला. नाशिकमधील खड्डेमय रस्ते आणि रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे झालेल्या मृत्यूंची स्वतंत्र विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली.






