Prithviraj Chavan : भाजपने बदलेली भूमिका देशहिताची; कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला

मुंबई : जनगणना करून वास्तव्य समाजासमोर आणणे गरजेचे असते. त्यासाठी ती महत्त्वाची आहे. 2011 पासून आतापर्यंत दहा वर्षातून एकदा जनगणना होणे अपेक्षित होते, मात्र ती झालेली नाही. पण आता केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या आम्ही स्वागत करत आहोत. या जनगणनेमध्ये जातवार वर्गीकरण होणार आहे, हेही अतिशय महत्त्वाचे आहे.
काँग्रेस पक्ष त्याची अनेक वर्षापासून मागणी करत आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी वेळापत्रक काय आहे? तेही केंद्राने लवकरात लवकर जाहीर केले पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवली. तसेच भाजपने आपली भूमिका बदलली आहे, ही गोष्ट देशासाठी अत्यंत चांगली असल्याचा टोलाही त्यांनी लगाविला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारने देशाची जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. परंतु जातनिहाय जनगणना करण्याची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जोरदारपणे लावून धरली होती. मात्र भाजपाने त्याचा विरोधही केला आणि टिंगल केली होती. पण आता जातनिहाय जनगणनेला भाजपाही तयार झाले आहे.
काँगेसच्या मागणीतील गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु मागील दशकभरात प्रशासकीय जनगणना झालेली नाही. शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये जनगणना होणे आवश्यक होते, मात्र सरकारने कोविडचे कारण देऊन ते टाळले. वास्तविक पाहता जगातील सर्व देशांनी या काळात जनगणना पूर्ण केली. मात्र केंद्र सरकारने ते टाळले आणि हेच वास्तव आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.





