Prithvi Shaw : ‘चुकीच्या मित्रांमुळे आणि अयोग्य निर्णयाने भरकटलो’, पृथ्वी शॉचा मोठा खुलासा, ऋषभबद्दल काय म्हणाला?

Prithvi Shaw Interview Viral : भारतीय क्रिकेटमध्ये एकेकाळी चमकणारा पृथ्वी शॉ सध्या संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत आहे. वयाच्या २५व्या वर्षी पृथ्वी शॉला रणजी करंडकात मुंबईच्या संघातून बाहेर काढण्यात आले होते. विजय हजारे करंडकातही त्याला संधी मिळाली नाही. २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना त्याने १३४ धावांची खणखणीत खेळी केली होती. मात्र, त्याच्यासाठी सध्या काळ खडतर आहे. आता त्याने आपल्या अडचणींविषयी मोकळेपणाने बोलताना सांगितले की, तो भरकटला होता.
ऋषभ पंत वगळता कोणीही विचारपूस केली नाही –
पृथ्वीच्या पदार्पणाच्या खेळीवर प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते की, पृथ्वी शॉमध्ये सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि वीरेंद्र सहवाग यांचे गुण दिसतात. मात्र, गेल्या वर्षी आयपीएल २०२५ च्या लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. पृथ्वी शॉ याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या कारकिर्दीतील संघर्षांबद्दल सांगितले. तो म्हणाला, ऋषभ पंत वगळता कोणीही त्याच्या संघर्षाच्या काळात त्याला फोन केला नाही किंवा त्याची विचारपूस केली नाही.
ध्यान भरकटल्याने करिअर बिघडले –
Prithvi Shaw – Only Rishabh Pant Reached Out to him During his Tough Times pic.twitter.com/vcUXLiOoTM
— Sandy (@flamboypant) June 25, 2025
२५ वर्षीय पृथ्वी शॉ म्हणाला, “बर्याच गोष्टी घडल्या. लोकांना हे वेगळे वाटेल, पण मला काय झाले ते माहित आहे. मी ते समजू शकतो. मी आयुष्यात अनेक चुकीचे निर्णय घेतले. मी क्रिकेटला कमी वेळ द्यायला सुरुवात केली. पूर्वी मी खूप सराव करायचो. उदाहरणार्थ, मी नेट्समध्ये ३-४ तास फलंदाजी करायचो. फलंदाजीमुळे मी कधीच थकायचो नाही. मी अर्धा दिवस मैदानावर घालवायचो. मी मानतो की माझे ध्यान भरकटले होते.”
चुकीच्या मित्रांचा सहवास लाभला –
तो पुढे म्हणाला, “मला चुकीच्या मित्रांचा सहवास लाभला, ज्यामुळे माझे नुकसान झाले. मी नको त्या गोष्टींना महत्त्व देण्यास सुरुवात केली. त्यावेळी यशाच्या शिखरावर होतो. त्यामुळे मला काही चुकीचे मित्र भेटले. मित्रत्व निर्माण झाले आणि त्या मित्रांनी मला इकडे-तिकडे नेले. यामुळे मी योग्य मार्गापासून भरकटलो. पूर्वी मी मैदानावर आठ तास सराव करायचो, पण आता फक्त चार तास सराव करतो.”
हेही वाचा – IND vs ENG : ‘मोठ्या लक्ष्याचा पाठलाग, सातत्याचा संकल्प’, बेन स्टोक्सने सांगितले लीड्स कसोटीच्या यशाचे गुपित
आजोबांचे निधन झाले –
कुटुंबाबद्दल बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला, “बर्याच गोष्टी आहेत. फक्त हीच बाब नाही. माझ्या कुटुंबात एक अडचण होती. माझ्या आजोबांचे निधन झाले. ते मला खूप प्रिय होते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु मी त्या अनुभवल्या आहेत.” पृथ्वी शॉ यांनी आपल्या चुका मान्य केल्या. त्यानी सांगितले की त्याच्या वडिलांनी नेहमी त्याला साथ दिली, मग त्याचा काळ कितीही वाईट असला तरी. त्यांनी चांगले आणि वाईट असे दोन्ही दिवस अनुभवले आहेत.





