IND vs ENG : ‘मोठ्या लक्ष्याचा पाठलाग, सातत्याचा संकल्प’, बेन स्टोक्सने सांगितले लीड्स कसोटीच्या यशाचे गुपित

IND vs ENG Ben Stokes Statement : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्सवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सनी पराभव केला आणि मालिकेची विजयाने सुरुवात केली. या विजयानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला, या मैदानावर (हेडिंग्ले) आमची यापूर्वीही चांगली कामगिरी झाली आहे. या विजयाने त्यात आणखी एक संस्मरणीय क्षण जोडला. हा एक उत्तम कसोटी सामना होता, विशेषतः शेवटच्या दिवशी इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेन डकेटने उत्तम कामगिरी केली.
बेन स्टोक्सकडून डकेट-क्रॉलीचे कौतुक –
बेन स्टोक्स म्हणाला, “जेव्हा आम्ही नाणेफेकीनंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्हाला वाटले की यामुळे आम्हाला जिंकण्याची सर्वोत्तम संधी मिळेल. भारताने पहिल्या दिवशीही शानदार फलंदाजी केली आणि आम्ही पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली. मला वाटले नाही की नाणेफेकीचा निर्णय बदलला पाहिजे होता. सुरुवातीच्या सामन्यात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नसते. क्राऊलीसोबतच्या त्याच्या भागीदारीमुळे आम्हाला बळ मिळाले. क्राऊलीचा डावही महत्त्वाचा होता. दोघेही एकमेकांना चांगले समजून घेतात आणि संतुलित खेळतात.”
उर्वरीत लढतींमध्येही हेच सातत्य राखण्याचा प्रयत्न –
बेन स्टोक्स पुढे म्हणाला, “पहिल्या डावात ऑली पोपने शानदार फलंदाजी केली. जोश टँगच्या स्पेलने सामन्याचा मार्ग बदलला. आमच्या कठोर परिश्रमाचे फळ म्हणजे आम्ही टॉप ऑर्डरला बाद करण्यात यशस्वी झालो. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केल्याने आत्मविश्वास येतो, परंतु ते प्रत्येक वेळी होईलच असे नाही. मालिकेची ही एक उत्तम सुरुवात आहे. आम्ही बराच वेळ मैदानावर राहिलो पण प्रत्येक सत्रात असा विचार केला की आपल्याला खेळाला वळण द्यावे लागेल. आता उर्वरीत लढतींमध्येही हेच सातत्य राखण्याचा प्रयत्न करू, असेही स्टोक्स म्हणाला.”
हेही वाचा – Shubman Gill : ‘मला माझ्या खेळाडूंवर अभिमान…!’, लीड्स कसोटीतील पराभवानंतर गिलचा संघावर विश्वास
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे उर्वरित वेळापत्रक:
-
दुसरी कसोटी: २-६ जुलै २०२५, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
-
तिसरी कसोटी: १०-१४ जुलै २०२५, लॉर्ड्स, लंडन
-
चौथी कसोटी: २३-२७ जुलै २०२५, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
-
पाचवी कसोटी: ३१ जुलै- ४ ऑगस्ट २०२५, द ओव्हल, लंडन





